एनिग्मा !!!

खरंतर इतक्या लगेच दुसरं पोस्ट लिहायचा माझा विचार अजिबातच नव्हता.. जरा नव्या ब्लॉगचे नवेपण एन्जॉय करत होते..! आणि नेहेमीसारखी नेटवर ब्राऊझ करताना गाणी ऐकत बसले होते.. आणि वाटलं लिहावं गाण्यांवर.. ते पण माझा सगळ्यात आवडत्या म्युझिक ग्रुप बद्दल.. Enigma !!

एनिग्मा हा एक म्युझिकल प्रोजेक्ट आहे,जो michael cretu,david fairstein,frank peterson या लोकांनी मिळून बनवला १९९० मधे.. क्रेटूची बायको सॅंड्रा काही गाण्यांना व्होकल्स देते..अन्य माहीती विकिपिडीया वर मिळेलच!

या ग्रुपबद्दल निदान मराठी विश्वात फार काही लिहीलं गेलं नाहीये असे दिसतय.. चान्सेस कमीच आहेत म्हणा.. कारण माझ्या एवढ्या मोठ्या मित्र-मंडळामधे एनिग्मा आवडणारे अगदी (एका) हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी लोकं भेटली.. बाकी असंख्य लोकांना त्यांची गाणी म्हणजे सॅड, गंभीर,गुढ,mysterious आणि depressing वाटली.. त्यातलं डीप्रेसींग सोडलं तर बाकी सगळं खरं आहे.. नावाप्रमाणे सगळी गाणी एनिग्माटीक आहेत.. मला जमेल तसं लिहून बघते त्यांच्या गाण्यांबद्दल..!

माझ्या या झपाटलेपणाला सुरवात झाली Sadness या गाण्यापासून.. (इथे मला नमूद केले पाहीजे, की एनिग्माचे व्हीडिओज जरा विक्षिप्त असतात.. बर्‍याचदा काही कळत नाही काय चाललंय.. मुद्दाम गुढ थीम ठेवत असावेत.. किंवा गाण्यातून काय घ्यायचं ते प्रेक्षकांवर सोडल्यासारखे.. ) असो.. हे गाणं सुरू होतं आणि आपण लिटरली एका वेगळ्या विश्वात जातो.. गाण्याचे बीट्स,सुंदर म्युझीक,कमीत कमी पण वेगळीच लिरीक्स, वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स,वेग-वेगळ्या भाषेमधील चॅंट्स हे एनिग्माचे वैशिष्ट्य ! असं मी तरी आधी कधीच ऐकले नसल्याने मेज्जर ओढले गेले एनिग्माकडे..

यानंतर मी एका मागोमाग एक गाणी ऐकतच सुटले.. नशीबाने जवळपास सगळं एनिग्माचे कलेक्शन मला मिळाले.. आणि खरंच झपाटले.. त्यानंतर मी गाणं पाहीलं ते म्हणजे Return of innocence .. हे बहुतेकांना माहीत असायची शक्यता आहे.. माणसाच्या मृत्युपासून जन्मापर्यंत असा उलट्या पद्धतीने घेतलेला हा व्हीडीओ फारच छान आहे!

असेच T.N.T. for the brain .. या नावाच्या अर्थापासून ते व्हीडीओपर्यंत काय आहे ते काही कळत नाही.. परंतू अफलातून गाणं! गाण्याच्या सुरवातीला चक्क आपला तबला आहे! मस्तपैकी आपल्याला धक्का देऊन हे गाणं चालू होते, ते पुर्ण गाणंभर तो तबला कानामधे निनादत राह्तो.. अफाट गाणं आहे राव.. डोळे मिटून हे गाणं ऐकायचं बस्स. काय वेगळा अनुभव येतो.. मला स्वतःला कुठेतरी एका शांत समुद्रकिनार्‍यावर एकटीच बसलीय असा फील येतो हे गाणं ऐकताना.. तर माझ्या मैत्रीणीला एका गर्द जंगलात हरवल्यासारखे वाटले होते.. जसे जसे गाणे पुढे जाते तसा रिदम , तबल्याची गती वाढायला लागते.. आणि हे गाणं अक्षरशः चढतं!! खरंतर, नीट ऐकले तर तबला आहे त्याच गतीने वाजताना दिसतो.. परंतू आपल्याला ते इतकं फास्ट चालूय असं वाटतं ना.. भारी प्रकार आहे बुआ!

दुसरं एक गाणं.. Push the limits .. हे अजुन थोडं वेगळं गाणं! शब्द म्हणाल तर फार काही नाही.. पण तरी व्हीडीओ याचा जर पाहीलात तर समजेल की स्त्री आणि पुरूष यांच्या मधील द्वंद्व आहे हे.. ते एनिग्माने सेक्स आणि केंदो या गेमच्या माध्यमातून दाखवले आहे.. कधी पुरूष वरचढ ठरतो तर कधी स्त्री.. पण शेवटी एका बाजूला पुरूष जिंकताना दाखवलाय तर दुसरीकडे स्त्री.. या व्हीडीओचे खूप अर्थ लागू शकतात.. एक म्हणजे its about two forming into one.. रिलेशन्शीप मधे कधीकधी आपण एकमेकांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करतो, पण तसे नसते.. रिलेशनशीप ही दोघांनी मिळून पुढे न्यायची.. one can’t exist without the other.. किंवा हे एकाच माणसाच्या दोन बाजू असतील.. बरेच अर्थ निघू शकतात विचार करायचा झाला तर.. इव्हन युट्युबवरच्या व्हीडीओवर कमेंट्स मधे लोकं त्यांचे त्यांचे तर्क सांगतात.. ते पण पट्णेबल आहे.. एकंदरीत वेगळं गाणं, वेगळा व्हीडीओ.. ( एनिग्मा या ग्रीक शब्दाचं मीनींग आहे, रिड्ल.. ! सगळे व्हीडीओज रीड्ल्सच आहेत! 🙂 )

मी सगळ्यात थक्क झाले ते child in us या गाण्यात संस्कृत ऐकुन!!! तोपर्यंत मला कळून चुकले होते की हे जरा वेगळे काम आहे.. जॉर्जियन,तैवानियन वगैरे चॅंट्स असतात यांच्या गाण्यात.. पण संस्कृत!? फार मस्त वाटत त्यामुळे हे गाणं ऐकताना.. तसं बाकी काही नाहीय.. पण एनिग्माच म्युझिक, आणि बॅकग्राऊंडला संस्कृत श्लोक.. मेडीटेशन साठी पर्फेक्ट कॉम्बो ! ( बायदवे, तसही एनिग्माची गाणी कॉन्संट्रेशनसाठी बेस्ट आहेत.. मी माझा सगळा इंजिनिअरींगचा अभ्यास एनिग्माच्या गाण्यावर केलाय.. try it! )

beyond the invisible !! माझं सगळ्यात आवडतं गाणं.. त्यातलं ते ” Sajaja bramani totari ta, raitata raitata, radu ridu raitata, rota ” ऐकायला फार मस्त वाटतं.. ही कुठली भाषा ते मी चेक नाही केलं.. पण असो.. लिरीक्सपेक्षाही मला व्हीडीओ आवडतो.. विचित्र असणारच.. पण त्यात जंगलात ice skating घेतलंय ते सिंपली अमेझिंग आहे! गाण्याच्या बीट्स वर ते स्केटींग करतात ते बघितलंच पाहीजे..

मी इथे सगळी गाणी नाही लिहू शकत.. पण या २ गाण्यांचा उल्लेख केलाच पाहीजे.. पहीलं म्हणजे, 20,000 miles over the sea .. असलं शांत गाणं आहे ना हे.. आणि ज्यानी कोणी हा व्हीडीओ तयार केलाय त्याला मानलं.. ऑफिशियल व्हीडीओ नाहीय.. पण अमेझिंग वर्क डन ! तो गाण्यातला सुदींग इफेक्ट व्हीडीओत पण आलाय ! नक्की बघा !

दुसरं अतिप्रिय गाणं म्हणजे Invisible love ! ह्म्म, माझे शब्द आता कमी पडत चाललेत.. छान वाटतं हे खूप कमी पडतंय सांगायला पण फार्र-फार्र आवडतं हे गाणं मला.. हा (अनॉफिशिअल)व्हीडीओ आहे..

अजुन चिक्कार गाणी आहेत.. एनिग्माबद्दल मी कितीही बोलू शकत असले तरी माझ्या मर्यादा मला माहीती आहेत! मला हे सगळं शब्दात नाही सांगता येणारे.. पण बर्‍याच जणांना एनिग्मा म्हणजे काहीतरी wierd,depressing प्रकार वाटतो, तसा मला नाही वाटत.. रादर, मला तो जरा जास्तच अमेझिंग प्रकार वाटतो.. असं म्युझिक सुचतं कसं,किती ते कष्ट? असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स,चॅंट्स आणून गाण्यात वापर करा..सुंदर गाणी वर्षानुवर्ष तयार करताय्त ही लोकं..मला गाणं गाऊ शकणार्‍या लोकांबद्दल खूप हेवा वाटतो,की कसं आवडीचं गाणं गाऊ शकतात वगैरे.. पण एनिग्मा सापडल्यापासून हेव्याच्याही पुढची पायरी ओलांडली आहे! कसं जमतं? आपल्याला ते नाही जमत तर निदान त्याच्यावर लिहून तरी बघावं म्हणून हा खटाटोप..!! 🙂

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया